गुप्त बैठक मंत्र्यांच्या बंगल्यावर राजेंद्र जंजाळ अ‍ॅक्शन मोडवर... भाजपने प्रवेश देऊ नये ः सिरसाट गटाचा दबाव

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी थेट मंत्र्यावर तोफ डागल्याने राज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा पुन्हा एकदा लाईम लाईटमध्ये आला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेले जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतरही त्यांची नाराजी कमी झालेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार जंजाळ भाजपच्या संपर्कात आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत एका मंत्र्यांच्या बंगल्यावर जंजाळ यांची बैठक झाली, त्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जाते. दुसरीकडे जंजाळ यांना भाजपने प्रवेश देऊ नये, असा निरोप सिरसाट यांनी दुतामार्फत भाजप नेत्यांना दिला आहे.

शिवसेना शिंदे गटात सध्या वादळ उठले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत. या वादाने शिंदे गटाचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ आहेत. अवघ्या दोन तीन वर्षात शिंदे गटात दुफळी माजली. उभे दोन गट झाल्याचे दिसून येत आहेत. खा. संदिपान भुमरे, आ.प्रदिप जैस्वाल आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ एकीकडे तर पालकमंत्री संजय शिरसाट माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन आदी पदाधिकारी दुसरीकडे असा काहीसा प्रकार आहे. जंजाळ यांच्या नाराजीचे कारण नव्याने आलेले काही लोक असल्याचे बोलले जाते.

उपमुख्यमंत्र्यांनाही वेगळे भेटले...

दोन दिवसांपुर्वी शहरात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक नेते वेगवेगळे भेटले. खा.भुमरे, ऋषिकेश जैस्वाल यांच्यासह राजेंद्र जंजाळ यांनी विमानतळावर भेट घेतली तर पालकमंत्री शिरसाट गटातील माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन यांनीही शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे शहरातील शिंदे सेनेत उभे दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसून येते.

मंत्र्यांसोबत गुप्त बैठक...
दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार नाराज जंजाळ यांच्यावर भाजपने कित्येक महिन्यांपासून जाळे टाकले होते. गेल्या आठवड्यात भाजपच्या एका बड्या मंत्र्यांची जंजाळ यांनी मुंबईत भेट घेतली. त्यांच्या बंगल्यावर दोघांची गुप्त बैठकही झाली. त्यानंतरच जंजाळ अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे बोलले जाते. त्यांनी सिरसाट यांच्यावर थेट आरोप करीत खळबळ उडवून दिली.

सिरसाट यांचा दूतही...
दरम्यान, जंजाळ यांच्या हालचालींवर सिरसाट समर्थक नेत्याची बारीक नजर आहे. जंजाळ हे मुंबईत गेल्यानंतर सिरसाट यांचे समर्थक काही नेते मुंबईत पोहोचले. जंजाळ यांनी भाजप मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सिरसाट यांचे दूतही त्या मंत्र्यांना भेटल्याचे समजते. जंजाळ यांचा भाजप प्रवेश रोखण्याचा प्रयत्न सिरसाट गटाकडून होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.